Ad will apear here
Next
आखाजीचा मोलाचा सन देखा जी....
बहिणाबाई चौधरी (छायाचित्र सौजन्य : आठवणीतली गाणी)आखाजी म्हणजेच अक्षय्यतृतीया! उन्हाचा कहर वाढत असतो, जिवाची लाही लाही होत असताना आखाजीच्या सणाची तयारी स्त्रिया मोठ्या उत्साहानं करतात. आखाजीचा सण खानदेशात विशेष रूपानं साजरा होतो. बहिणाबाई आपलं रोजचं जगणं आपल्या गाण्यांमधून गात असत. यशवंत देवांसारख्या श्रेष्ठतम संगीतकाराने आपल्या प्रतिभावान संगीतकलेचा साज बहिणाबाईंच्या गाण्यांना दिला आणि घराघरांत पोहोचली बहिणाबाईंची गाणी. उत्तरा केळकर यांच्या खणखणीत आवाजातलं ‘आखाजीचा सन’ हे गीत ऐकताना स्त्रीमनाचा झोका माहेराला कधी पोहोचतो हे कळत नाही... ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘आखाजीचा सन’ या गीताबद्दल....
...................

‘फोन इन आपली आवड’ कार्यक्रम सादर करत असताना एका श्रोत्यानं बहिणाबाई चौधरी यांच्या गीताची फर्माईश केली. मी विचारलं, ‘बहिणाबाईंची कितीतरी गाणी आहेत. कोणतं गाणं ऐकायचंय?’ तर त्यानं आवर्जून सांगितलं, ‘यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं...खोप्यामंदी खोपा.’ हे गाणं त्या श्रोत्यासाठी लावलं...पण मीसुद्धा बहिणाबाईंच्या साध्या, सोप्या आणि अवघ्या जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या शब्दलालित्यात हरवून गेले....अनेक गाण्यांनी माझ्या मनात फेर धरला...बहिणाबाईंची कविता थेट मातीशी नातं सांगणारी, धरणीआईच्या कुशीतून उमललेली! उत्तरा केळकर यांच्या आवाजात यशवंत देव यांनी अशी स्वरबद्ध केली की बहिणाबाईंच्या कवितेचं सोनं झालं....

खानदेशच्या मातीचा सुगंध ल्यालेल्या या अनेक गीतांपैकी ‘आखाजी’चं गाणं हमखास आठवतंय. कारण आता अक्षय्यतृतीयेचा सण आपण साजरा करणार. आखाजी म्हणजेच अक्षय्यतृतीया! उन्हाचा कहर वाढत असतो, जिवाची लाही लाही होत असताना आखाजीच्या सणाची तयारी स्त्रिया मोठ्या उत्साहानं करतात. आखाजीचा सण खानदेशात विशेष रूपानं साजरा होतो. बहिणाबाई आपलं रोजचं जगणं आपल्या गाण्यांमधून गात असत. स्वत: निरक्षर, पण साक्षात सरस्वती त्यांच्या मुखातून बोले. त्यांचे चिरंजीव सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंची गाणी लिहून ठेवली. म्हणून तर हा अस्सल ठेवा मराठी सारस्वताला मिळाला. यशवंत देवांसारख्या श्रेष्ठतम संगीतकारालाही त्याचा मोह पडला....आपल्या प्रतिभावान संगीतकलेचा साज त्यांनी बहिणाबाईंच्या गाण्यांना दिला आणि घराघरांत पोहोचली बहिणाबाईंची गाणी. उत्तरा केळकर यांच्या खणखणीत आवाजातलं ‘आखाजीचा सन’ हे गीत ऐकताना स्त्रीमनाचा झोका माहेराला कधी पोहोचतो हे कळत नाही.

आखाजीचा आखाजीचा 
मोलाचा सन देखा जी 
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी ।

खानदेशात अक्षय्यतृतीयेला सासुरवाशिणी माहेराला जातात... स्त्रीमनाचा हळवा कप्पा म्हणजे तिचं माहेर. या हळव्या कप्प्याविषयी बहिणाबाई तरी कशा अपवाद असणार?

माझा झोका माझा झोका
चालला माहेराले जी
आला झोका आला झोका
पलट सासराले जी ।

स्त्रीमनाची स्पंदनं यशवंत देव यांनी स्वरांमधून अचूक टिपली आणि उत्तरा केळकर यांच्या गळ्यातून अशी गाऊन घेतली की रसिक त्या गाण्याच्या झोक्यावर देहभान हरपून झुलू लागतो. शहरी असो की ग्रामीण, स्त्रीमनाची स्पंदनं वेगळी नसतात. आपलं माहेर, आपलं गाव, माहेरचा वारा, माहेरची माती, सणवार सगळ्याच बाबतीत तिचा जीव होतो अलवार...आठवणींचा झोका तिच्या मनात सदैव झुलत असतो. किती खेळ आठवतात तिला? बहिणाबाईंनी इतकं सुरेख वर्णन केलंय...

झाला सुरू झाला सुरू
पहिला माझा पिंगा जी
फुगड्यांचा फुगड्यांचा
चालला धांगढिंगा जी ।

यशवंत देव यांनी बहिणाबाईंच्या गीतातली लय अचूक पकडली आणि रसिकमनाला बहाल करून टाकली ही आखाजीच्या गाण्याची स्वरभेट. कवीच्या मनातले भाव संगीतकाराला ओळखता आले पाहिजेत. तेव्हाच भावसंगीत मनाला आनंद देऊ शकतं. बहिणाबाईंच्या ओव्यांमधला भाव यशवंत देवांसारख्या समर्थ संगीतकाराला भावला, म्हणून तर बहिणाबाईंची गाणी घराघरात पोहोचली. मानिनी या चित्रपटासाठी सुप्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांनीसुद्धा बहिणाबाईंची गाणी आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली. चित्रपटकथा पुढं सरकण्यासाठी ही गाणी उपयुक्त ठरली. आजही या गीतांचं स्थान रसिकांच्या ह्रदयात आहे; पण त्यानंतर यशवंत देव यांनी बहिणाबाईंची गाणी खास ‘मुंबई दूरदर्शन’साठी केली. विख्यात अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी निवेदन केलं आणि उत्तरा केळकर यांनी आपल्या उत्तम स्वराभिनयात ती सादर केली. त्यानंतर बहिणाबाईंच्या गाण्यांच्या कॅसेट अफाट लोकप्रिय झाल्या....याचं श्रेय बहिणाबाईंच्या शब्दसामर्थ्याला आहेच, त्याबरोबरच यशवंत देव यांच्यासारखे दिग्गज संगीतकार आणि उत्तरा केळकर यांच्यासारख्या गुणी गायिकेलाही आहे.
आधुनिक जीवनशैली माणसांनी कितीही अंगीकारली, तरी शेती-मातीचा सुगंध त्याला हवाहवासा वाटतोच. मनाचा झोका हिंदोळत राहतो त्या आठवणींपाशी....माणूस रमतो त्या भावजीवनाशी.....त्या मातीतल्या गाण्यांशी....

माझा झोका माझा झोका
जिवाची भूक सरे जी
भूक सरे भूक सरे
वाऱ्यानं पोट भरे जी ।

बहिणाबाईंच्या कवितेचा निर्मळ वारा श्वासात खोल खोल भरून घ्यावा असा. शुद्ध प्राणवायू देणारा, जगणं निरोगी करणारा. आखाजीचा सण उन्हाची तलखी कमी करणारा, माहेर भेटवणारा, ‘संगातिनी’ म्हणजे मैत्रिणींना भेटवणारा, त्यांच्याबरोबर चार घटका खेळवणारा, हितगुज गप्पागोष्टींची संधी देणारा. अक्षय्यतृतीयेला खानदेशात मुली गौराई बसवतात, सजावट करतात, टिपऱ्या खेळतात, सांजोऱ्याचा नैवैद्य दाखवतात. पुरणाचे मांडे आणि आमरस हे आखाजीच्या सणाचं खास वैशिष्ट्य. बहिणाई म्हणते . . .
गवराई गवराई
सजव सजवल्या जी
संगातिनी संगातिनी
बोलव बोलवल्या जी ।

किती सुंदर नादमाधुर्य बहिणाबाईंच्या कवितेत आहे. सहज सोपी चाल यशवंत देव यांना सुचत गेली असेल बहिणाबाईंच्या शब्दांमधूनच. ‘कवितेतले शब्द माझ्यासमोर चाल घेऊनच येतात,’ असं यशवंत देव म्हणतात. सुरांनी शब्दांचं बोट अचूक धरलं की त्याचं सुंदर गाणं होतं. अगदी तस्साच अनुभव आपल्याला बहिणाबाईंच्या या ‘आखाजीच्या सणाच्या गाण्यात येतो. अक्षय्यतृतीयेचा सण झाला, की शेताची मशागत करायची. सण संपला की सासरी जायचं...चार दिवसांची गंमत-जंमत विसरून दैनंदिन कामाला लागायचं... कष्टाचं जिणं आनंदानं जगायचं....आखाजीचा सण संपतो, जिवाला लागलेली हुरहुर या गाण्यातून आपल्यापर्यंत पोहोचते...

चार दिस चार दिस
इसावल्या घरात जी
आहे पुढे आहे पुढे
शेताची मशागत जी ।
सण सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी
सांग सई सांग सई
आखजी आता कही जी?

रसिकहो सांगा बरं, सईच्या तोंडातून बहिणाबाईंनी विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तराऐवजी हुंदकाच बाहेर पडणार ना....प्रश्नाचं उत्तर सासुरवाशिणीची आसवंच देणार आणि आपण सारे आखाजीच्या या स्वरांच्या झोक्यावर अलगद झोके घेत राहणार....अक्षय्यतृतीयेच्या अर्थात आखाजीच्या सणासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा!

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. या सदराच्या लेखांचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते पुस्तक किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. )
 


(लेख पूर्वप्रसिद्धी : २५ एप्रिल २०१७)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZOPCL
Similar Posts
जोवरी हे जग, तोवरी गीतरामायण... ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात रामनवमीच्या औचित्याने गीत रामायणावरचा हा लेख....
चाफा बोलेना... संगीतकाराला काव्याची उत्तम जाण असेल, तर त्याने दिलेल्या चालीवर कविता कशी मोहरते आणि रसिकांच्या मनात सदैव रेंगाळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कवी ‘बीं’चं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं ‘चाफा बोलेना’ हे गाणं. १९ जानेवारी हा वसंत प्रभूंचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज घेऊ या त्याच कवितेचा आस्वाद
घाल घाल पिंगा वाऱ्या... अत्यंत तरल भावकविता लिहिणारे कवी कृ. ब. निकुंब यांचा आज, नऊ ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. त्या निमित्ताने, ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘घाल घाल पिंगा वाऱ्या...’ या त्यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल...
हसले मनी चांदणे... भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं, नाट्यगीतं, ख्याल, ठुमरी... असे गाण्याचे कितीतरी प्रकार माणिकताईंच्या स्वरांनी सजलेले आहेत. आज, १६ मे, माणिक दादरकर अर्थात माणिक वर्मा यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’च्या आजच्या भागात माणिक वर्मा यांनी गायलेल्या ‘हसले मनी चांदणे...’ या गीताबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language